";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- संपादकीय
अग्रलेख


अखेर भिन्नतेचा स्वीकार

 

 

अखेर भिन्नतेचा स्वीकार

भारतीय संविधान कलम 377 नुसार परस्पर सहमतीने समलिंगी संबंध ठेवणे गुन्हा मानला जात होता. दीडशे वर्षे इंग्रजांनी भारतावर राज्य केले त्या काळात यात कोणताच बदल झाला नव्हता. साधारण दहा वर्षांपूर्वी काही लोकांनी समलिंगी संबंधितांची एक संघटना स्थापन केली तर पाच, सहाजणांनी याविषयी न्यायालयीन लढा सुरू केला. तत्पूर्वी नेदरलँडमध्ये 2000 साली समलिंगी विवाह कायद्याने मान्य केला.

 

 

2015मध्ये अमेरिकेने अशा विवाहांना मान्यता दिली. भारतातही हा विषय दशकभर चालू होता. अखेर सर्वोच्च न्यायालयाने आपला पूर्वीचा निर्णय बदलून, गेल्या आठवड्यात समलैंगिक संबंध हा गुन्हा नसल्याचा एक ऐतिहासिक पण न पटणारा निर्णय दिला. तो निर्णय पाच सदस्यांच्या खंडपीठाने एकमताने दिला हे विशेष ठरते. न्यायालयाने ही तरतूद घटनेतील समानतेचा अधिकार भंग करीत असल्याचे स्पष्ट केले आहे. परस्पर सहमतीने असलेल्या समलिंगी संबंधाला गुन्ह्याच्या चौकटीत ठेवणारी कलम 377ची तरतूद तर्कहीन मनमानी आणि बचाव न करता येण्याजोगी आहे, असे न्यायालय म्हणते. सरन्यायाधीश दीपक मिश्रांच्या मते घटनेतील समानतेचा अधिकार आणि प्रतिष्ठेने जगण्याचा हक्क प्रत्येकाला आहे. इतकेच काय असे संबध ठेवणे हे नुकसानदायी नाहीच व समाजासाठी घातकही नाही. म्हणजे दोन पुरुष किंवा दोन स्त्रिया परस्पर सहमतीने एकत्र रिलेशनशिपमध्ये राहू शकतात. न्यायालय म्हणते, आपल्याला पूर्वग्रहमुक्त व्हावे लागेल, सर्वसमावेशक व्हावे लागेल. तसेच सर्वांना समान अधिकार व हक्क याची हमी द्यावी लागेल.

सर्वात मोठे न्यायाधीश असे म्हणतात म्हणजे त्यात काही तथ्य तर असायलाच हवे, पण अधिकार व व्यक्तिस्वातंत्र्याचा बराच गैरअर्थ कायद्याचा कूट काढून निघत आहे याचाही कधीतरी विचार व्हायला हवा. व्यक्तिस्वातंत्र्य इतपत ठीक, पण भिन्नतेचा समंजस स्वीकार करणे तितकेच चुकीचे आहे. मात्र समलैंगिक संबंध हा कोणताही अपराध, गुन्हा नाही असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे, तसेच व्यक्तिस्वांतत्र्याचे तत्त्वही अधोरेखित केले आहे. इंग्रजाच्या राजवटीत 1862मध्ये असे संबंध गुन्हा ठरविण्यात आला होता.

नव्या निकालाची विशेष बाब म्हणजे 2013 मध्ये आपणच दिलेल्या निकालाचा काळाच्या ओघात अधिक वेगळा विचार करून तो बदलण्याची तयारी सर्वोच्च न्यायलयाने दाखविली आहे. अर्थातच न्यायसंस्थेला या निर्णयाप्रत आणण्यासाठी संबंधित व्यक्तींनी दिलेला प्रखर लढाही तितकाच कारणीभूत ठरला आहे. इंग्रजांनी हा कायदा आणला त्याचे कारण त्या काळातील समाजातील नैतिकेच्या कल्पना असा होता. त्या वेळी शुद्धतेच्या समाजाच्या कल्पनांचा आग्रह एवढा होता की लैंगिक व्यवहारातील कोणतीही भिन्नता ते सहन करू शकत नव्हते. लोकशाहीत व्यक्तीचे स्वातंत्र्य महत्त्वाचे ठरते. खरे तर प्रत्येक वेगळेपण विकृती ठरत नाही. तरीही समलिंगी संबंधांना मिळालेल्या मान्यतेनंतर आपण कोठेही काहीही बिनधास्तपणे करू शकतो असा समज होऊ नये.

आपण असे संबंध ठेवू इच्छितो असे जाहीरपणे सांगणार्‍या व्यक्तींमध्ये सेलेब्रिटींचा समावेश असल्यामुळे या निर्णयाचा उत्सव साजरा होत आहे, हे स्पष्ट आहे. जगात सुारे तीस देशात अशा संबंधांना मान्यता आहे, तर जागतिक आरोग्य संघटनेनेच अशा संबंधांना मानसिक विकृतीतून वगळले आहे. प्रत्येकाच्या आवडीनिवडीचा, निर्णयाचा आदर करणे हेच व्यक्तिस्वातंत्र्याच्या जमान्यात अभिप्रेत आहे. आपल्याकडे असे संबंध ठेवणारे लोक नगण्य आहेत. जास्तीत जास्त लोकांचा विवाहसंस्था, कुटुंबसंस्था यावर विेशास आहे. इतकेच काय समलिंगी संबंध हा किळसवाणा प्रकार आहे असे ते समजतात. शेवटी प्रकृतीने, निसर्गाने पुरुष व स्त्री अशी भिन्नलिंगी समाजव्यवस्था निर्माण केली आहे, त्याला कोणीही आव्हान देऊ शकत नाही.

 

मानव की, आदिमानव

 

 

मानव की, आदिमानव

माणसाची उत्पत्ती आदिमकाळात झाली. आदिमानव हा पूर्णपणे गांगारलेला होता. आपण कोण आहोत, कोठे निवारा घ्यावा, भूक कशी भागवावी असे अनेक यक्षप्रश्न त्याच्या पुढे होते. किंबहुना निबिड अरण्य आणि निसर्गाच्या क्रुद्ध लहरीखेरीज दुसरे काहीही त्याच्या वाट्याला येत नव्हते. निसर्गातील घटनाक्रमाचा भाग त्याला समजला नसल्याने माणूस दैवाधिन झाला असेल, इतपत समजू शकते. त्या वेळी पारलौकिक शक्तींच्या अस्तित्वाबद्दलचा भीतिदायक विचार माणसांच्या डोक्यात शिरला असणार यातही नवल नाही.

दिवस-रात्र, सूर्य-चंद्र, आकाशातून कोसळणारा पाऊस, विजांचा कटकडाट, वादळ-वावटळ हे सारे पाहून त्याला भीती वाटली असेल तर ते साहाजिकच म्हटले पाहिजे. या संकटांवर मात करण्यासाठी त्याने सृष्टीच्या देवी- देवतांची आराधना सुरू केली असेल, आणि त्यातूनच दैवते, धर्म जात-पात, पंथ, वर्ण नावाची आचारसंहिता विकसित झाली. पुढे माणूस स्वयंभू विकसित झाला. त्याचा आत्मविेशास वाढू लागला आणि तो पृथ्वीवरून चंद्र व मंगळ ग्रहापर्यंत पोचला. अनेक जुन्या कल्पना आणि त्यावर आधारलेल्या रूढींना तडे जाऊ लागले. तरीही समाजातील काही लोक पूर्वापार रुढींना चिटकून राहिल्याची उदाहरणे समोर येत आहेत.

अंधश्रद्धा हा आपल्याकडील जुनाट रोग आहे. जादूटोणा, गंडादोरा, बुवाबाजी, लोभ व हव्यास आजही आपल्याभोवती फेर धरून नाचत आहेत. कोणतीही अर्थव्यवस्था कमी अवधीत दुप्पट पैसे देऊ शकत नाही, हे वास्तव असताना शिकलेसवरलेले लोक त्या डोहात मिटक्या मारत फसतात. त्यामुळे विज्ञान, वास्तव, वस्तुस्थिती या सार्‍या गोष्टी गुंडाळून माणूस आजही आदिम काळात वावरत असेल तर यांना रोखायचे कसे ही फार मोठी समस्या आहे. महाराष्ट्र हा बुद्धिप्रामाण्य व विवेकवादी शिकवणीची भूी आहे.

अशी अनेक शतकांची परंपरा असणारा महाराष्ट्र अद्याप अंधश्रद्धेच्या काळोख्या विळख्यातून पूर्णपणे बाहेर आलेला नसल्याचे सांगणार्‍या घटना आजही घडत आहेत. नुकतेच मराठवाड्यात गुप्तधनासाठी एका मुलीचा, तर वर्‍हाडात पैशाचा पाऊस पाडण्यासाठी तरुणाचा नरबळी देणारी व्यक्ती शिक्षक असल्याचे समजले. अंधश्रद्धेचा पगडा असलेल्या एका कुटुंबातील चार वर्षांच्या बालकाचा किरकोळ आजाराने मृत्यू झाला. जवळच दवाखाना असणारे डॉक्टर स्वत:हून उपचार करण्यास गेले असता त्यांना हाकलून लावले. पुण्यातील ख्यातनाम रुग्णालयात एका डॉक्टरनेच रुग्णावर उपचार करण्यासाठी मांत्रिकाला पाचारण करण्याची घटना घडली आहे.

दोन डॉक्टरांधील विषमता काय असू शकते याचा प्रश्न नक्कीच सतावतो. पुण्यातील नामवंत महाविद्यालयात सत्यनारायणची पूजा झाली, हा मुद्दाही बराच गाजला. एकंदरीत आपला समाज आजही मागासलेलाच आहे. रूढी, रीती, परंपरा आपल्याला इतक्या चिकटल्या आहेत की त्यातून सर्वसामान्य माणूसच नव्हे तर उच्चशिक्षित माणूसही सुटू शकत नाही असे चित्र आहे. समाज विज्ञाननिष्ठ होण्यासाठी आपल्याला अजून बराच मोठा टप्पा गाठावा लागेल. अंधश्रद्धा जितक्या दुबळ्या होत जातील आणि माणूसकीशी नाते सांगणारी नाती, मूल्ये जेवढी अधिक प्रमाणात वाढतील, तेवढा समाज प्रगल्भ होईल. त्यानंतरच विज्ञाननिष्ठ समाज निर्माण होईल, पण काम अंत्यत कठीण आहे. अंधश्रद्धेच्या विरोधात डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी फार मोठी चळवळ उभी केली होती.

ज्या शनिशिंगणापुरात चोरी होऊ शकत नाही तिथे मी चोरी करून दाखवतो, असे आव्हान दिले होते. आज त्या गावात चोर्‍या-मार्‍या, दरोडे-खून, लुटालूट होत आहे. इतकेच काय तिथे सुसज्ज पोलीस चौकी उभारावी लागली आहे. अंधश्रद्धेला विरोध करणार्‍या डॉ. दाभोळकरांना वीरमरण आले. त्यानंतर सरकारने जादूटोणा किंवा अंधश्रद्धाविरोधी कायदा अस्तित्वात आणला. आजही देशातील अनेक राज्यात खापपंचायतीनिवाडा करतात. हीसुद्धा एक प्रकारे अंधश्रद्धाच आहे. कोणत्याही घटकांना आळा बसला नाही, हे सिद्ध झाले आहे.

कारण यात प्रश्न आहे तो पोलीस, प्रशासन, सरकारच्या इच्छाशक्तीचा. राजकीय लाभ उठविण्यासाठी सारे काही क्षम्य असते. यथा प्रजा तथा राजाअशी उलट म्हण सांभाळावी लागते आणि म्हणूनच अंधश्रद्धेविरोधात तीव्र मोहीम राबविली जात नाही हे कटू सत्य आहे. जातीय व धार्मिक ध्रुवीकरणाच्या वातावरणात आपण नक्की कोठे प्रवास करत आहोत याचा सकल समाजाने विचार करण्याची वेळ आली आहे. समाजात वेगवेगळ्या तर्‍हेने फसविणारे असंख्य भामटे आहेत, याचा अनुभव वारंवार येत असतो. तरीही समाज आदिमकाळातील आदिमानवासारखा का वागतो हे प्रचंड कोडे आहे. श्रद्धा जरूर असावी, पण ती जागृत असावी, त्याचे रूपांतर अंधश्रद्धेत करू नका, एवढीच अपेक्षा!

 

इम्रानशाही

 

इम्रानशाही

 

 

पाकिस्तानचा एकेकाळचा अष्टपैलू क्रिकेटपट्टू व त्याकाळातील जगातीलसर्वात वेगवान गोलंदाज इम्रान खान याने 14 ऑगस्ट रोजी पाकिस्तानच्य स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानपदाची साधेपणाने शपथ घेतली. किक्रेट जगतावर ठसा उमटवलेला हा खेळाडू पंतप्रधान होण्याची जगातील पहिलीच घटना आहे. इम्रानच्या पाकिस्तान तेहरिक ए-इन्साफया पक्षाला सर्वांधिक जागा मिळाल्या, पण बहुत नाही. इतर पक्षांच्या साह्यावर तो त्या पदापर्यंत पोचला आहे. पाकिस्तानमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांवर नजर टाकली तर तेथील लष्कराने लिहिलेल्या संहितेबरहुकुम सारे काही घडले आहे.

मुशर्रफ, शरीफ, भुट्टो झाले, आता लष्कराला नवा मोहरा हवा होता, तो इम्रानच्या रूपाने मिळाला. आपल्या मुठीतील पंतप्रधान पाकिस्तानी लष्कराला हवा असतो, हे आता गुपित राहिले नाही. म्हटले तर तिथे सर्व यंत्रणा जागच्या जागी आहेत. स्वतंत्र म्हणविणारा निवडणूक आयोग आहे, इतर राजकीय पक्ष आहेत, मतदान केंद्रे आहेत, मतदान प्रतिनिधी आहेत, इतकेच काय पण युरोपीयन समुदायाचे निवडणूक निरीक्षकही मौजूद आहेत, हे सारे असूनही निवडणुका निष्पक्षपणे पार पडल्या या दाव्याविषयी जगात साशंकता आहे.

या देशाच्या डगमगत्या लोकशाहीत यापेक्षा वेगळे अपेक्षित नव्हते. स्वातंत्र्यानंतर सात दशके हा देश हुकुमशाही अंलाखाली वावरत आहे. थोडीफार लोकशाही नांदू लागली पण त्यातही लष्कराचा वरचष्मा कायम आहे. इम्रानला मैदान सपाट व्हावे म्हणून नवाज शरीफ यांना आधीच भ्रष्टाचारांच्या आरोपावरून तुरुंगात डांबले. मतमोजणीच्या वेळी पाकिस्तान लीग व पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या प्रतिनिधींना मतमोजणी केंद्रातून हुसकावून लावल्याचा आरोप शाहबाज नवाझ व बिलावल भुट्टो यांनी केला आहे. त्यामुळेच इम्रान यांचे हे यश निखळ राहात नाही. मुळातच क्रिकेटमध्ये वलय प्राप्त झालेले इम्रान राजकीय मैदानातही उत्तम खेळी करतील अशी एक किनार मतदारांची असू शकते. परंतु या अपेक्षांना पूर्ण करणे सोपी बाब नाही.

एकतर पाकिस्तानमधील व्यवस्थेवर आजही लष्कराची पकड घट्ट आहे. तेथील नागरी-मुलकी व्यवस्थेचा कमालीचा संकोच झाला आहे. इम्रान यांना याच चौकटीत काम करावे लागणार आहे. इम्रान खान जिद्दी खेळाडू जरूर आहे. 1992 साली पाकिस्तान क्रिकेट संघ विेशकरंडक स्पर्धेत पूर्णपणे तळाला गेला होता, तरीही जग्गजेतेपद पटकावले ते इम्रानच्या नेतृत्वाखाली. पण क्रिकेटचे मैदान आणि राजकीय मैदान यात जमीनअस्म ानाचा फरक आहे, राजकारणात मजल मारण्यासाठी त्यांना तिखट गोलंदाजी करावी लागेल. शिवाय जे दहशतवादी याच देशाने तयार केले, त्यांचा भस्मासूर थैान घालत आहे, त्यांना इम्रान कसे रनआऊटकरणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे.

पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना आता राजकीय प्रक्रियेतही शिरकाव करू पाहत आहेत. या निवडणुकीत त्यांची डाळ शिजली नाही तरी हे धोक्याचे सावट आहे, हे नाकारून चालणार नाही. पाकिस्तानात जे काही नागरी जीवन थोडेफार अस्तित्वात आहे, ते आणखी उंचावण्यासाठी इम्रान यांना आपली दुसरी इनिंग सुरू करावी लागेल. अर्थिक स्थैर्य, विकास, शांतता वगैरे ओशासने त्यांनी तोंड भरून दिली असली तरी, त्यासाठी देशांतर्गत पातळीवर कडव्या धर्मांधतेला आवर कसा घालायचा हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर असेल. पाकिस्तानसमोर सर्वात मोठा व तातडीचा मुद्दा आहे तो म्हणजे पूर्णपणे बुडती अर्थव्यवस्था, चलनाचा घटता दर आणि आर्थिक आघाडीवरची दाणादाण, यातून फुगलेली तूट, अमेरिका आता पूर्वीसारखी भरघोस मदत करणार नाही. मग पर्याय उरतो तो आंतरराष्ट्रीय नाणे विधी व व चिनी मदतीचा. मात्र ही मदत नव्या अटी स्वीकारल्याच तर मिळणार आहेत.

तेथील लष्कर ही अट मान्य करणार नाही. मग इम्रान नव्या-नव्या तुानीवर लाल चेंडू घासत राहणार. भारताशी संबंध सुधारण्यासाठी निदान प्रयत्न करू पाहणार्‍या नवाझ शरीफ यांचा उत्तराधिकारी म्हणून येणारा पाकचा नवा कप्तान लष्कराने घालून दिलेल्या मर्यादेपलीकडे जाण्याची जराही शक्यता नाही. लष्कराची दुकानदारी प्रामुख्याने भारतद्वेषावर आधारलेली आहे. त्याला पाकिस्तानी राष्ट्रवाद, धर्मांधता, दहशतवाद याची फोडणी देणारा आहे. आज इम्रानच्या मंत्रिमंडळात मुशर्रफ काळातील मंत्र्याचा भरणा जास्त आहे. तेथील लष्कराने नवा गाडी नवे राज्य असा खेळ मांडला आहे. काश्मीर प्रश्नासंबंधी त्यांची भूमिका तीच राहणार आहे. त्यामुळेच भारताने सावध राहून पावले उचलणे योग्य.

 

अटल अर्णव

अटल अर्णव

भारतीय लोकशाहीच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलणारे सर्वप्रियनेते व माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन झाले. त्यांच्या जाण्याने देशाच्या राजकीय इतिहासातील एका देदीप्यमान अध्यायाची सांगता झाली. भारतासारख्या खंडप्राय देशात समर्थ विरोधी पक्ष उभा करणे आणि प्रयत्नपूर्वक जनाधार वाढवून सत्तेच्या सोपानापर्यंत कूच करणे याचे महत्त्व त्यामुळेच अनन्यसाधारण. या परिर्वतनाचे नायक होते अटलजी, काँग्रेसचा खराखुरा विरोधक ठरले. भाजपला 1996, 1998मध्ये सत्ता मिळाली ती अवघी तेरा दिवस व पुढे तेरा महिने. पण 1999पर्यंत सत्ता पाच वर्षे टिकवली ती वाजपेयी यांच्या मुत्सद्दीपणामुळेच. या सत्तेचे सुकाणू सांभाळले ते त्यांनीच.

आजही भाजपची सत्ता आहे, पण त्यातही त्यांचा दशकभर राजकारणापासून दूर राहूनही अबोलवाटा आहे, हे सर्वांना मान्य करावे लागेल. जनसंघाचा वारसा लाभलेला भारतीय जनता पक्ष देशाची सत्ता सांभाळू शकतो, राज्यघटनेच्या मूल्यांशी बांधिलकी दाखवू शकतो, कारभार करतो याविषयीच्या शंका-कुशंकांना वाजपेयी यांनी पूर्णविराम दिला. 1999 मध्ये भाजपच्या डझनावारी मित्रपक्षांना बरोबर घेऊन पाच वर्षे देशाचा कारभार समर्थपणे हाताळला. विरोधकांना प्रत्युत्तर देताना, टीका सहन करताना भाषेची शालीनता व राजकारणाच्या पलीकडे जाऊन मैत्री जपण्याची वृत्ती त्यांनी कायम जपली. राजकारणाच्या धबडग्यातही अंतरातील काव्यवृत्ती, विनोद, नाट्य, चित्रपट, भारतीय गायन कलेचा बाज त्यांनी कधीही हरवू दिला नाही.

लतादीदी व बाबूजी (फडके) त्यांना अधिक प्रिय होते. सत्तेवर आल्यावर पूर्वसुरींनी घालून दिलेली सगळीच घडी विस्कटून टाकायची अशा घातक प्रवृत्तीचा संसर्ग वाजपेयींना कधीच झाला नाही. त्यामुळेच पंडित नेहरूंनी घालून दिलेली परराष्ट्र धोरणातील पंचशील तत्त्वांची परंपरा अटलजींनी कायम ठेवली. नेहरू व वाजपेयी खर्‍या अर्थाने जगाचे शांतिदूत होत. खुल्या आर्थिक धोरणांची नांदी नरसिंहराव - मनमोहन सिंग यांनी केली, पण त्याला अटलराजवटीत खर्‍या अर्थाने प्रोत्साहन मिळाले. प्रसंगी भाजप आणि संघ परिवार यांचा विरोध पत्करून तीच वाट चोखाळत अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी प्रयत्न केले.

काश्मीरचा प्रश्‍न सोडवण्यासाठी हुकुमशहा मुशर्रफ याला मैदानात खेचले. त्यात इन्सानियतहा मुद्दा लावून धरला. त्या शब्दाचा अर्थ मुशर्रफला कळला नाही, तेव्हा नाइलाजाने कठोरपणे कारगील युद्धात त्याला ठेचूनही काढले. सर्व जगाला धक्का देऊन पोखरणमध्ये अणुचाचणी केली. त्याला त्यांनी बुद्ध हसलाअसा सुंदर पॉज दिला. अमेरिकेसह अन्य राष्ट्रांनीही त्या घटनेला विरोध केला नाही हे विशेष ठरले. अणुचाचणी ही अणुअस्त्रे बनवण्यासाठी नाहीत, तर भारतीय जनतेच्या कल्याणासाठी आहेत, याची खात्री त्यांनी जगाला करून दिली. एकात्मता, संरक्षण, विकास ही वाजपेयींच्या राष्ट्रवादी विचारांची त्रिसूत्री होती.

दिमाखदार वक्तृत्वाचे देणे त्यांना लाभले होते. लाखांच्या सभा त्यांनी सहज जिंकल्या त्या अमोघ वक्तृत्वावर. आँखोंें वैभव के सपने, पग में तूफानों की गति हो... राष्ट्रभक्ती का ज्वर न रुकता, आए जिस जिस की हिम्मत होअसा सोज्ज्वळ, कवी मनाचा, कठोर राष्ट्रभक्ती असलेला नेता म्हणजे अटल अर्णव. अर्णव म्हणजे समुद्र, सागर, रत्नाकर. ज्याची खोली, ठाव अथांग आहे. त्याचप्रमाणे वाजपेयी होते. राजकारण हे सज्जन लोकांचे क्षेत्र नाही, असा समज बाळगणार्‍यांचा प्रतिवाद करण्यासाठी फार सायासांची गरज नाही. केवळ अटल नामाचाउच्चार पुरेसा आहे. भारतीय संरक्षकदले व त्यांचे कुटुंबीयांविषयी त्यांना प्रचंड अभिमान, आदर व प्रे होते. सरकारी तिजोरीतील धन वाचवण्यासाठी सन 1996च्या आधीच्या हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना कोणताही मोबदला दिला जाऊ नये, अशा आशयाचा आदेश निघणार होता.

तो अटलजींनी धुडकावून लावताना लाल पेनने एकच वाक्य लिहिले, “शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मोबदला देताना जवान कधी शहीद झाला त्याची अंतिम मर्यादा तारीख म्हणजे 15 ऑगस्ट 1947.” आणि नियतीनेही त्यांना 15 ऑगस्टचा सूर्यास्त आनंदाने डोळे भरून पाहू दिला. याचाच अर्थ सारे ब्रह्मांड त्यांच्यापुढे झुकत होते. शेवटी या कोलहृदयी आणि कणखर अटलजींना सविनय अभिवादन, भावपूर्वक श्रद्धांजली!

 

स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे

 

 

स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे

 

भारताचा स्वातंत्र्यदिन बुधवारी 15 ऑगस्टला साजरा झाला. स्वातंत्र्य मिळून सात दशके ओलांडून आठव्या दशकाकडे वाटचाल सुरू झाली आहे. भारताला स्वातंत्र्य देणार असे इंग्रजांनी जाहीर केल्यावर अनेकांना धक्का बसला होता. तो दिवस नको, तो झेंडा नको, आम्ही या देशाचा भागच नाही, अनेक संघटना व संस्थानिकांनी त्यात खोडा घालण्याचा प्रयत्न केला होता. आजही तेच चालू आहे. मग असा प्रश्न पडतो की, आपल्याला स्वातंत्र्याचे महत्त्वच कळाले नाही. इंग्रज देश सोडून गेले खरे, पण क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक, तत्कालीन नेते याचे स्मरण फक्त पंधरा ऑगस्टपुरतेच ठेवले.

ऐ मेरे वतन लोगों, जरा आँखमें भर लो पानीअशी गाणी क्षणभर ऐकायची, भावूक व्हायचे आणि त्यांची कुरबानी विसरून जायची. स्वातंत्र्याची सत्तरी ओलांडली तरी आजही रस्त्यावर, कचराकुंडीत झेंडे टाकू नका हे सांगण्याची वेळ येते. ब्रिटिश काळात हा झेंडा जमिनीवर पडू नये म्हणून अनेकांनी गोळ्या झेलल्या! 15 ऑगस्टला सरकारी व खासगी आस्थापनातील लोकांना ध्वजवंदना देण्यासाठी उपस्थित राहण्याची सक्ती करावी लागते. 15 ऑगस्टला जोडून सुट्टी यावी अशी अपेक्षा असते, म्हणजे पिकनिकला जाता येते. तेथे अवगुणांचा झेंडा फडकाविणे ही आपली नीती. त्या स्पॉटवर स्वच्छता, शिस्त राखणे, धांगडधिंगा न करणे ही खरी राष्ट्रभक्ती. आपल्याला थोडाफार अर्थ आणीबाणीच्या काळात समजला होता,

पण आपले स्वातंत्र्य हिरावून घेतले गेले याचे दु:ख फार काळ टिकले नाही. आणीबाणी लादणार्‍या कै. इंदिरा गांधींना लोकांनी पुन्हा निवडून दिले. यामागचे कारण म्हणजे बहुतांश लोकांना व्यक्तीस्वातंत्र्याची गरज भासत नाही. सातत्याने कुठल्या ना कुठल्या व्यक्तीची किंवा पक्षाची विचारसरणी लोकांना भावते. इतकेच काय आपला आवडता नेता भ्रष्टाचारी आहे हे जाहीर झाल्यावरही जनतेत फरक पडत नाही.

अगदी गुन्हेगारसुद्धा तुरुंगातून निवडून येतात. त्याला कारण आम्ही हजार-दोन हजार रुपयांसाठी पाच वर्षे पणाला लावतो. मुळातच स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार झाला आहे. वाहतुकीचे नियम सर्रास मोडणे, वाटेल तिथे गाड्या पार्क करणे, रस्त्यात थुंकणे, कचरा टाकणे, रूळ ओलांडणे, मागण्या व हक्कांसाठी संप, आंदोलने करणे, सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, भर रस्त्यावर अनेक निर्भयांच्या अब्रू लूटून जीव घेणे आणि या सार्‍याची जबाबदारी सरकारवर टाकून हात झटकून मोकळे होणे याला आम्ही गोंडस नाव दिले आहे

स्वातंत्र्य. आज जगातील सगळ्यात मोठ्या लोकशाहीचा, हजारो वर्षांची उज्ज्वल परंपरा असलेल्या, प्रचंड आध्यात्मिक वारसा लाभलेल्या, अठरापगडा जातिधर्माला सामावून घेणारा भारत देशाचा नागरिक म्हणून आपण स्वत:कडे कसे पाहतो हा विचार प्रत्येकाने करायल हवा. माझा धर्म, माझी जात, गाव, भाषा याविषयी निष्ठा, प्रे, अभिमान असायला हरकत नाही, पण तो राष्ट्राभिमानाहून मोठा होऊ लागला तर? राष्ट्राच्या एकसंघ स्वरूपाला हा अभिमान धक्का देऊ लागला तर? राष्ट्रीय शांतता, सुव्यवस्था, साहचर्य या सगळ्या बाबतीत आपण मागे जात आहोत. असेच होणार असेल तर भारतीय म्हणून आपले अस्तित्व किती काळ टिकून राहील याचा विचार करायला हवा.

भारताला स्वातंत्र्य देताना हे लोक देश चालवू शकणार नाहीत, असे चर्चिलसह अनेकांचे मत होते, आज आपण उद्योग, शिक्षण, आरोग्य, शेती, रस्ते, वाहतूक, रेल्वेचे जाळे, दूधक्रांती यात प्रगती केली आहे. पण लोकसंख्येच्या मानाने ती कमी पडते. आणखी प्रगती करावी लागेल. त्याची मुख्य जबाबदारी तरुणांवर आहे. कुठेतरी आल्हाददायक चित्र पाहायला मिळते. ऐतिहासिक किल्ल्यांची स्वच्छता, ट्रॅफिक जॅमध्ये स्वत:हून मदतीला धावणारे लोक, आरोग्य, पाणी, शेतकरी यांच्यासाठी झटणारे हात. पूर, वादळ, भूकंपात मदतीचा ओघ, रस्त्यावर अपघातग्रस्त जखमींना तत्काळ रुग्णालयात पोचविणारे तरुण, पर्यावरणासाठी काम करणार्‍या संस्था असा विस्मयजनक समूह पाहिला तर असे वाटते की अशाच लोकांच्या भरवशावर इंग्रज देश सोडून गेले असावेत. मूठभर लोक हे सारे करतात,

पण आपल्या पुढच्या पिढीचे डोळे तिरंगा बघताना भरून यावेत यासाठी सर्वांची एकजूट व्हायला हवी. अन्यथा हा राष्ट्रद्रोह ठरेल. कधी कधी आणखी एखादी फाळणी जवळ आलीच काय याची भीती वाटते. आधीची फाळणी धर्माुळे झाली होती, आता जातीमुळं होईल अशी चिंता वाटते... पण लक्षात ठेवा, स्वातंत्र्य हे मातीला सादर झाले आहे, जातीला नाही. अनेक ध्वज आपण पाहतो, पण तिरंगा ध्वज न्यारा आहे, प्यारा आहे, देश पंधरा ऑगस्टला वेगळाच वाटतो. मेरे देशकी धरती, सोना उगलेऐकून अंगावर शहारे येतात, छाती फुलून येते तिरंगा बघून. पण ते सारे एकदिवसीय नाटक नसावे. जगाती सर्वांत मोठ्या लोकशाही देशाचा हा राष्ट् ध्वज आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे. त्याबरहुकूम वर्तन ठेवावे एवढीच अपेक्षा. जय हिंद!

 


Page 5 of 65

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 139

era

little-birdies


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds